हडपसर पोलिसांची कामगिरी : तब्बल ३ महिने व ७०० किमीचा प्रवास, दोघा चोरट्यांसह सोनारालाही अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हडपसर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यात स्प्लेंडरवरून चोरटे येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यावरून हडपसर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल ३ महिने शहर व ग्रामीण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढला. रांजणगाव ते कात्रज या पट्ट्यात जवळपास ७०० किमीचा प्रवास करत त्यांनी या चोरट्याला पकडले. तो पुणे शहर व पिंपरी-चिंचवडसह शंभरहून अधिक घरफोडीचे गुन्हे करणारा ‘चोर राजा’ असल्याचे उघड झाले.
राजेश राम पपुल ऊर्फ चोर राजा (वय ४०, रा. सच्चाई माता मंदिर, दुगड चाळ, कात्रज), प्रदीप ऊर्फ गणेश बाळासाहेब गाडे (वय ३५, रा. गगनगिरी हाईट्स, नांदेड सिटी) आणि सोनार कुणाल रुपेश वाफगांवकर (वय २३, रा. मंदार अपार्टमेंट, दांगट पाटीलनगर, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हडपसर परिसरात १७ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या घरफोडीत एक जण स्प्लेंडर गाडीवरून येऊन चोरी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. या फुटेजच्या आधारे गेल्या ३ महिन्यांपासून तपास पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
यासाठी पोलिसांनी रांजणगाव ते कात्रज या परिसरातील ७०० किमीचा प्रवास करत विविध रस्ते, गल्ल्या व बोळात जाऊन तपास केला. आरोपी पकडले जाऊ नयेत म्हणून गुन्ह्याच्या सुरुवात व शेवटच्या दरम्यान ते वेळोवेळी दुचाकी बदलणे, रिक्षाचा वापर करणे, कपडे व मास्क बदलणे अशी खबरदारी घेत असत.
तरीही तपास पथकाने दुचाकीवरून जाणाऱ्या चोर राजाला व त्याच्या साथीदाराला पकडले. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. चौकशीत दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून, हडपसर परिसरातील ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या गुन्ह्यातील चोरलेले दागिने कुणाल वाफगांवकर या सोनाराच्या मदतीने विकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या सोनारालाही अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अनिल बिनवडे, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, दीपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, दत्तात्रय खेडेकर, चंद्रकांत रेजीतवाड, सागर ननावरे, महावीर लोंढे व दत्तात्रय खेडेकर यांनी केली आहे.
