आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अधिकाऱ्यांची नागरिकांसोबत थेट भेट सुनिश्चित

Spread the love

पुणे : नागरिकांना आपल्या अडचणी व समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस सोमवार व गुरुवार नागरिकांच्या भेटीसाठी कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत.

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या आदेशानुसार, या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्या अंतर्गत कार्यालयीन पातळीवर हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

PMRDA कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व नागरिक–प्रशासन यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार आणि गुरुवारी महानगर आयुक्तांसह सर्व विभागप्रमुख कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची भेट घेणार आहेत.

त्यामुळे नागरिकांना आपले प्रश्न, अडचणी आणि सूचना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळणार आहे. विकास कामांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार हे दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

तसेच, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत विभागप्रमुखांच्या अधीनस्त अधिकारी नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहतील.
अधिकार्‍यांसाठी जेवणाची वेळ दुपारी १.३० ते २.०० अशी निश्चित करण्यात आली आहे.

PMRDA कडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी सोमवार किंवा गुरुवारी कार्यालयास भेट द्यावी. यामुळे कामकाज अधिक सुसूत्र आणि परिणामकारक होईल.