५२६२ कोटींचा प्रकल्प : वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी दिलासा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील हडपसर ते यवत दरम्यानच्या सततच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. या मार्गावर सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) व रस्ता रुंदीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जागेच्या अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दौंडचे आमदार राहुल कूल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या मागण्यांमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल कूल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही प्रकल्पासाठी आग्रह धरला होता.
गडकरी यांनीही प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेत, सविस्तर डीपीआर तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. परिणामी, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आता गती मिळाली आहे
या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल, आणि स्थानिक विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
