आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र बँकेच्या शाखेतच सायबर क्राईम

Spread the love

पुणे : सायबर चोरटे केवायसीबाबत ज्येष्ठ नागरिकांना मेसेज पाठवून एक एपीके फाईल (APK file) पाठवतात. ही फाईल भरून पाठविण्यास सांगून त्याद्वारे गोपनीय माहिती मिळवतात आणि खात्यातील पैसे काढतात. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून एका सेवानिवृत्त व्यक्तीने महाराष्ट्र बँकेच्या वडगाव बुद्रुक येथील शाखेत जाऊन थेट केवायसी केली. तरीसुद्धा, त्यांच्या बँक खात्यातून पाच वेळा पैसे काढण्यात आले असून, एकूण ९ लाख ९९ हजार ९९९ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

बँकेच्या शाखेत जाऊन केवायसी केल्यानंतर सायबर गुन्हा घडल्याचा हा पहिलाच प्रकार असून, २२ एप्रिल रोजी महाराष्ट्र बँकेच्या वडगाव बुद्रुक शाखेत ही घटना घडली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या शाखेतील आणखी ५ ते ७ खातेदारांबाबतही असाच प्रकार घडल्याची शक्यता आहे.

या संदर्भात ५९ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे पुणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांना १८ एप्रिल रोजी केवायसीसंदर्भात महाराष्ट्र बँकेतून एक मेसेज आला.

त्यामुळे त्यांनी २२ एप्रिल रोजी वडगाव बुद्रुक येथील शाखेला भेट दिली आणि दुपारपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घरी परतले. घरी आल्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून ३ लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज त्यांना मिळाला.

हा मेसेज पाहून ते तात्काळ पुन्हा शाखेत गेले. तोपर्यंत त्यांच्या खात्यातून आणखी तीन व्यवहारांतून २ लाख रुपयांचे प्रत्येकी पैसे डेबिट झाले. एकूण ९ लाख रुपये त्यांच्या खात्यातून काढण्यात आले. त्यांनी शाखेतील कर्मचाऱ्यांना ही बाब सांगितल्यानंतर, त्यांचे खाते होल्ड करण्यात आले.

मात्र, त्यांच्या महाराष्ट्र बँकेच्या दुसऱ्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये डेबिट झाले होते. आपले बँक खाते हॅक झाल्याचा संशय आल्याने त्यांनी एनसीआरबी पोर्टलवर तसेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार पुढे सिंहगड रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.