भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : मृत्यू पावलेल्या मित्राने ठेवायला दिल्याचा दावा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. मृत्यू पावलेल्या आपल्या मित्राने हा कट्टा ठेवायला दिला होता, असा दावा या अल्पवयीन मुलाने केला आहे.
२९ एप्रिल रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोळे, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कात्रजकडून मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रतन मोटर्स या कंपनीच्या समोरील बाजूला एक जण गावठी कट्टा घेऊन थांबलेला आहे.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. या अल्पवयीन मुलावर यापूर्वी दरोड्याची तयारी आणि मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेला गावठी कट्टा मृत्यू पावलेल्या मित्राने ठेवायला दिला असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोळे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी केली.
