दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कामगिरी, सराफासह चौघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : धायरीतून दुचाकीवरून जाणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने दीड महिन्यानंतर जेरबंद करण्यात यश मिळवले. पोलिसांनी सराफासह चौघांना अटक केली आहे.
तेजस नितीन वायदंडे (वय २२, रा. चाफेकर चौक, चिंचवड गाव, मूळ रा. लासुर्णे, जि. सातारा) आणि त्याचे साथीदार वैभव राजेश कांबळे (वय २७, रा. शास्त्रीनगर, पिंपरी) आणि सचिन मल्लिकार्जुन स्वामी (वय २७, रा. साई कॉम्प्लेक्स, नखाते वस्ती, रहाटणी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत धायरीत राहणाऱ्या एका ३५ वर्षांच्या शिक्षिकेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या २४ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेचार वाजता धायरीतून कात्रजकडे दुचाकीवर मुलाला घेऊन जात होत्या.
यावेळी धायरी फाटा येथे पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे, २५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते.या गुन्ह्याचा तपास चैन-स्नॅचिंग पथकातील सहायक पोलीस निरीक्षक बेरड व अंमलदार करत होते.
तांत्रिक विश्लेषण करून व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना हा गुन्हा तेजस वायदंडे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेत असताना तो हडपसर येथील वैदवाडी येथे मोटारसायकलसह उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन तेजस वायदंडे याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चोरलेले मंगळसूत्र त्याने ओळखीच्या मित्र वैभव कांबळे याच्या करवी सचिन स्वामी याला दिले. त्याने ते त्याच्या ओळखीच्या ज्वेलर्सकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्या अंगझडतीत एक सोन्याची अंगठी मिळून आली.
त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सोन्याचे मंगळसूत्र घेणाऱ्या सराफालाही अटक केली आहे. दोन्ही गुन्ह्यातील मंगळसूत्र व अंगठी, असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी आरोपींना नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. बी. बेरड, पोलीस अंमलदार नाळे, साळवे, डापसे, राहुल इंगळे, बंटी सासवडकर, तनपुरे, गणेश ढगे, इरफान पठाण, अजित शिंदे, अमित गद्रे, गणेश गोसावी, मनोज खरपुडे यांनी केली आहे.
