महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि गौरव सोहळ्यांचा एकत्रित उत्सव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कोंढवा : दिनांक १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच कोंढवा-येवलेवाडी कार्यालयाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व साजशीर पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी कार्यालय व परिसराची स्वच्छता करून, फुलांची सजावट, रांगोळी, वीज रोषणाई यांसह संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर कार्यालयातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पेशवे तलाव व येवलेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांनाही पुष्पहार अर्पण करण्यात आले.
राष्ट्रगीत व राज्यगीताने कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला. कार्यालयातील सेवक गुणदर्शन कार्यक्रमांतर्गत विविध गुणदर्शन सादर करण्यात आले. यामध्ये सेविकेच्या मुलीने सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली. तिचा गौरव म्हणून तिला रोप असलेली कुंडी भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यालयातील गुणवंत अधिकारी, कर्मचारी व कामगारांचा प्रशस्तीपत्र व ट्रॉफीद्वारे गौरव करण्यात आला. सर्वांनी एकत्र येऊन उत्साहात केक कापून व विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा केला.
या कार्यक्रमात विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशासन अधिकारी यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचे महत्त्व उलगडून सांगितले. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांनी मनोगतातून सर्वांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी सर्व सेवकांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उप-अभियंता राखी चौधरी, प्रशासन अधिकारी सुनील मोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम व जालिंदर कदम, कनिष्ठ अभियंता नकुसा ढोले व सोमनाथ आवळे, उप अधीक्षक मोनिष बधे, अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत, परवाना व आकाश चिन्ह निरीक्षक प्रवीण गाडे यांची उपस्थिती होती.
