ताडीवाला रोडवरील प्रशांत कांबळे याला चऱ्होलीमधून अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रचार करण्यात गुंतलेला व ताडीवाला रोडवरून २०११ पासून बेपत्ता झालेला प्रशांत कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने चऱ्होली परिसरातून अटक केली. ठाणे येथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेली १५ वर्षे फरार होता. गेल्या ६ ते ७ वर्षांपासून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आदिवासी पाड्यांमधील मुलांना शिकविण्याचे काम करत होता. बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करत होता. ओळख पटू नये म्हणून त्याने वेशांतर केले होते.
एटीएसच्या पुणे पथकाला कांबळे हा पिंपरी-चिंचवड शहरातील चऱ्होली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी (३ मे) त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एटीएसच्या पुणे पथकातील पोलीस निरीक्षक सुजाता कानवडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. कांबळे याच्याविरुद्ध एटीएस मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध अधिनियमान्वये (यूएपीए) २०११ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रशांत कांबळे हा ताडीवाला रोडवर राहात होता. ५ नोव्हेंबर २०१० रोजी तो मुंबईला कामानिमित्त जातो, असे घरी सांगून निघून गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परत आलाच नाही. त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पुण्यातून बेपत्ता झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोन तरुण गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे समोर आले.
दोघेही सर्वोच्च माओवादी नेते मिलिंद तेलतुंबडे सोबत काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. लॅपटॉप चालविण्यात व दुरुस्त करण्यात प्रशांत कांबळे तरबेज आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये तो ‘लॅपटॉप’ नावाने ओळखला जात होता. गडचिरोलीत २०२१ मध्ये झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे मारला गेला होता.
संतोष शेलार हा आजारी पडल्यानंतर पुण्यात घरी आला होता. जानेवारी २०२४ मध्ये एटीएसने त्याला अटक केली होती. त्यानंतर आता प्रशांत कांबळे एटीएसच्या हाती लागला आहे. त्याच्या अटकेमुळे शहरी भागात माओवादाचा प्रसार करण्यात आणखी कोण-कोण गुंतले आहे, ते सध्या नेमके काय करत आहेत, याविषयी प्रशांत कांबळे याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
