“झिले सिंह यांचा पराक्रम सर्वांसाठी प्रेरक आहे” : प्रा. डॉ. संजय चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भीषण आतंकवादी हल्ल्यादरम्यान आपल्या प्राणांची पर्वा न करता शौर्याने लढणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) असिस्टंट कमांडर झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या पत्नी सुनीता झिले सिंह यांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती पुरस्कार’ देण्यात आला.
हा सन्मान सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी संस्थेच्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सिद्धांत चोरडिया, तसेच सूर्यदत्त समूहातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झिले सिंह यांच्या हस्ते ‘सूर्यदत्त ग्लोबल आर्मी’ चे उद्घाटनही करण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “झिले सिंह यांचा पराक्रम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मृत्यू समोर असताना, सहकारी शहीद होत असताना त्यांनी जे शौर्य दाखवले, ते देशभक्तीचे प्रतीक आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि सेवाभावाची भावना जागृत होते.”
झिले सिंह यांनी आपला अनुभव शेअर करताना भावुक होत सांगितले, “पुलवामा हल्ला माझ्यासाठी दुसरे जीवन ठरले. माझे सहकारी जखमी व शहीद होत होते, पण त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याची भावना माझ्या मनात होती. माझा पाठीचा कणा मोडला, एक हात व पाय मोडले, तरीही आत्मविश्वास ढळू दिला नाही. भारतीय सेना विजयी होईपर्यंत मी लढत राहिलो.”
त्यांनी पुढे नमूद केले, “महिलांचा सन्मान फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसावा, तर दररोज व्हायला हवा. प्रत्येक क्षणी त्यांचा आदर केला पाहिजे.”
कार्यक्रमाच्या शेवटी झिले सिंह यांनी दिलेले अनुभव ऐकून उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक भारावून गेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले, तर नरेंद्र कुलकर्णी यांनी ‘वंदे मातरम’ गीत सादर केले.
