जागरुक नागरिकाच्या माहितीमुळे खुनाचा उलगडा : पोलिसांच्या चौकशीत मुलानेच दिला खुलासा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह दुचाकीवरून विल्हेवाट लावण्यासाठी नेत असलेल्या पतीला जागरुक नागरिकाच्या माहितीवरून पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांनी चौकशीसाठी घरी नेल्यानंतर आठ वर्षाच्या मुलानेच आपल्या वडिलांनी आईचा गळा दाबून खून केल्याचे उघड केले. या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश राम नाईक निसार (वय २८, रा. धायरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर खून झालेल्या पत्नीचे नाव बबिता राकेश निसार (वय २६) आहे. स्वयंपाकावरून झालेल्या वादातून व घरखर्चासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून राकेशने बबिताचा त्यांच्या आठ वर्षाच्या मुलासमोर गळा दाबून खून केला.
मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला. एका व्यक्तीने दुचाकीवर संशयास्पद वस्तू नेत असल्याची माहिती दिली. त्यानुसार आंबेगाव व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या मार्शल टीमने भुमकर पुलाजवळ संशयिताला अडवले. पोलिसांना पाहताच तो दुचाकी टाकून पळू लागला, मात्र पोलिसांनी त्याला तात्काळ पकडले.
चौकशीत सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. “मित्राने मृतदेह दिला असून तो खेड शिवापूरजवळ नेऊन देतोय,” असे सांगत असंबद्ध माहिती देत होता. कधी म्हणाला तिने आत्महत्या केली आहे, कधी काहीतरी वेगळेच. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.
पोलिसांनी त्याचे राहते घर विचारून त्याला घरी नेले. त्यावेळी त्यांचा आठ वर्षांचा मुलगा झोपलेला होता. पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधताच त्याने स्पष्ट सांगितले की, “वडिलांनी आईचा गळा दाबून खून केला.” त्यावरून खुनाचा प्रकार उघडकीस आला.
राकेश हा मजुरी करून मिळणारे पैसे आपल्या गावी पाठवत असे आणि घरखर्चासाठी काहीच देत नसे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत. सोमवारी रात्री जेवणाच्या कारणावरून मोठा वाद झाला. बबिताने “पैसे नाहीत, जेवण कसे बनवू?” असे विचारले. त्यावरून दोघांमध्ये जोरात भांडण झाले आणि रागाच्या भरात राकेशने तिचा गळा दाबून खून केला.
खुनानंतर मृतदेह दुचाकीवरून घेऊन जात असताना जागरुक नागरिकाने पोलिसांना माहिती दिली आणि या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला. आंबेगाव पोलिसांनी आरोपी राकेश निसार याला पुढील कारवाईसाठी नांदेड सिटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
