भिंतीवर डोके आपटल्याने रक्तस्त्राव होऊन मृत्यू : कासेवाडीतील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : काकाने सांगितल्यामुळे तरुणाने दारू आणून दिली. “काकाला दारू का आणून दिली?” असे म्हणत पुतण्याने तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे डोके भिंतीवर आपटले. ज्याला दारू आणून दिली त्या काकानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन व त्यातून रक्ताच्या उलट्या होऊन तरुणाचा मृत्यू झाला. खडक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काका-पुतण्याला अटक केली आहे.
गोपाल जयराम आचार्य (वय २५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमीर शेख (वय ३८) आणि दानिश अली शेख (वय २१, दोघेही रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत रिक्षाचालक जयराम लोकनंदन आचार्य (वय ५१, रा. दीपज्योत तरुण मंडळाजवळ, कासेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता भवानी पेठेतील कासेवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल आचार्य हे रिक्षाचालक असून त्यांचा मुलगा गोपाल याने शेजारी राहणाऱ्या अमीर शेख याला दारू आणून दिली होती. हे समजल्यावर दानिश शेख याने “तू चाच्याला दारू का आणून दिली?” असे म्हणत जाब विचारून त्याला घराबाहेर घेऊन गेला. शेजारील भिंतीवर जोरजोरात डोके आपटले. तोंडावर चापटाही मारली. दारू आणून दिलेल्या चाचा अमीर यानेही गोपालला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जयराम आचार्य यांनी गोपालला सोडवून घरी आणले. गोपाल याने डोके दुखत असल्याचे सांगितले. परंतु गोपालला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि पोलिसांकडे तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गोपाल याला उलट्या होऊ लागल्या. हातपाय थरथरत होते, बोलता येत नव्हते. त्यांनी तातडीने गोपालला ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना सकाळी ११ वाजता गोपाल याचा मृत्यू झाला.
तपासणीत गोपालच्या डोक्यावर मारहाण झाल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तोंडातून रक्त येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खडक पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काका आणि पुतण्याला अटक केली आहे.
