सफाई कामगाराच्या मुलीचा बारावी कला शाखेत ८७% गुणांसह घवघवीत यश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कला शाखेतील विद्यार्थिनी सानिया शब्बीर शेख हिने ८७ टक्के गुण मिळवून धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सानियाची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिचे वडील नगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवता येते, हे सानियाने सिद्ध केले आहे.
इयत्ता दहावीत तिने ९२ टक्के गुण मिळवले होते. प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने कला शाखेत प्रवेश घेतला होता. आई-वडिलांचा खंबीर पाठिंबा, स्वतःची मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. तिच्या यशाचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष श्री. डी. डी. बोराडे, सचिन श्री. मुरलीधर काटे, पदाधिकारी श्री. उत्तम चाचा बोराडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संतोष शिंदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गंगाधर काळे यांनी केले, तर आभार प्रा. आर. डी. सोळंके यांनी मानले. सानियाच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
