पद्मश्री पं. रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध : ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ प्रदान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी त्यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कलेचे महत्त्व अधोरेखित करताना फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर राहून छंद जोपासावेत, असे आवाहन केले.
“गुरु केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर आयुष्याला दिशा देण्याचे काम करतो. विद्यार्थ्यांतील सर्वोत्तम गुण ओळखून त्यांचे घडवणारे सामर्थ्य गुरुंकडे असते. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अलौकिक आहे.
विद्यार्थ्यांनी मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहून छंद जोपासावेत. बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे बौद्धिक आणि सर्वांगीण विकास शक्य होतो,” असे मत पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांनी व्यक्त केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पं. मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ देण्यात आला. शिक्षण, कला, समाजसेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. गायिका आनंदी रोणू मजुमदार, शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट सुजाता कोडग यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदानप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया आणि सहकार्य उपाध्यक्षा स्नेहल नवलखा उपस्थित होत्या. प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कला — नाट्य, नृत्य, गायन आणि अभिनय — अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
या कलांमुळे सर्जनशीलता वाढते, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता विकसित होते. म्हणून रंगमंच हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असावा.” पं. मजुमदार यांच्या बासरीवादनाने कार्यक्रमात भावनांची उंची गाठली.
सानिया पाटणकर यांनी ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हे नाट्यपद व संस्कृत गणेश वंदना सादर केली. रोणू व आनंदी मजुमदार यांनी भक्तिरचना सादर करून वातावरण भक्तिमय केले यानंतर सानिया पाटणकर आणि आर्किटेक्ट सुजाता कोडग यांनी आपल्या क्षेत्रातील अनुभव शेअर करत विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय नरेंद्र कुलकर्णी यांनी करून दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल आणि संचालक प्रशांत पितालिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
