वाघोली येथील १० एकर जमीन हडपण्यासाठी बनावट महिला उभी करून खरेदीखत तयार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाघोली येथील १० एकर जमीन हडप करण्यासाठी बनावट महिला उभी करून ती जागा स्वतःची असल्याचे भासवून खरेदीखताचे दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद लालासाहेब भगत (रा. चिंतामणी पार्क, केसवडवस्ती जवळ, वाडेगाव, ता. हवेली), शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. रेल्वे गेटजवळ, नमो रेसिडेन्सी, ससाणेनगर, हडपसर), चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा ऊर्फ अर्चना पटेकर (रा. इस्लामपूर, सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वाती रामनाथ खेडकर यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२२ ते १७ मे २०२३ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद भगत याने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
तपासादरम्यान आनंद भगत यांच्या घरी बनावट कागदपत्रे सापडली. त्यावरून तपास पुढे नेला असता, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे व इतरांनी संगनमत करून वाघोली येथील १० एकर जमीन हडप करण्यासाठी अर्चना पटेकर या महिलेला “अपर्णा यशपाल वर्मा” या नावाने उभी केले.
तिला मूळ जमीनमालक असल्याचे भासवण्यात आले. “अपर्णा वर्मा” या नावाने बनावट दस्त नोंदणीसाठी खोटे आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून खरेदीखताचा दस्त तयार करण्यात आला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली.
त्यात बनावट कागदपत्रे तयार करण्यात या चौघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत. न्यायालयातील खटला काढून घेतला आनंद भगत यांनी अपर्णा यशपाल वर्मा यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात २०२३ मध्ये खटला दाखल केला होता.
त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला, ज्यात नमूद केले होते की, आमच्यात न्यायालयाबाहेर तडजोड झाली आहे आणि आम्ही हा खटला मागे घेऊ इच्छितो. त्यानुसार १३ डिसेंबर २०२४ रोजी न्यायालयाने हा खटला निकाली काढला.
पोलिसांना आनंद भगत यांच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांवरून न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वीच भगत व इतरांनी मिळून बनावट महिला उभी करून बनावट खरेदीखत तयार केल्याचे समोर आले आहे.
