कायदेशीर प्रक्रिया पूर्ण : व्यवसायिकांसाठी संधी – अनामत रक्कम ५ लाख, जीएसटी नंबर व परवाना अनिवार्य
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक वर्षांत जमा झालेली बेवारस वाहने आता लिलाव प्रक्रियेतून विक्रीस काढण्यात येत आहेत.
२२ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता हा जाहीर लिलाव पोलीस ठाण्याच्या आवारात पार पडणार आहे. संबंधित वाहनांबाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून, लिलावातून मिळणारी रक्कम शासनाच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यवसायिकांनी २२ मे रोजी सकाळी ८ ते ९.३० या वेळेत पोलीस ठाण्यात उपस्थित राहून नोंदणी पूर्ण करावी. वेळेत नोंदणी न झाल्यास लिलावात सहभागी होता येणार नाही.
या लिलावाद्वारे बार्शी व परिसरातील अधिकृत स्क्रॅप व्यवसायिकांना व्यवसाय विस्ताराची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले आहे.
लिलावासाठी आवश्यक अटी व शर्ती पुढीलप्रमाणे –
» इच्छुक व्यावसायिकाकडे वैध व्यवसाय परवाना आणि जीएसटी क्रमांक असणे आवश्यक आहे.
» नोंदणी प्रक्रिया २२ मे २०२५ रोजी सकाळी ८ ते ९.३० या वेळेतच पूर्ण करावी लागेल. त्यानंतर उपस्थित झालेल्या व्यक्तींना लिलावात सहभागी होता येणार नाही.
» इच्छुक व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नसावा. गुन्हा दाखल असल्यास संबंधित निकालाची प्रत सोबत सादर करणे अनिवार्य आहे.
» लिलावात सहभागी होण्यासाठी ५ लाख रुपयांची अनामत रक्कम “पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे” यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
» अनामत रक्कम फक्त डिमांड ड्राफ्ट (DD) स्वरूपात स्वीकारण्यात येईल. इतर कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही.
» लिलावातील सर्व वाहने रस्त्यावर वापरण्यास अयोग्य असून, ती फक्त स्क्रॅपसाठीच विक्रीस उपलब्ध असतील. ही वाहने कटरने तोडूनच पोलीस ठाण्याच्या परिसरातून बाहेर नेणे बंधनकारक आहे.
