११२ वर तक्रार केल्याच्या रागातून केला होता गोळीबार : बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत केली अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुचाकीचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादात ११२ नंबरवर पोलिसांना कळविल्याच्या रागातून गोळीबार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अमित महावीर लकडे (वय २८, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून देवा डोलारे (वय २२), गणेश भालके (वय २१, दोघे रा. अप्पर बिबवेवाडी) या दोघांना अगोदर अटक केली होती.
त्यानंतर सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अभय भालके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोळीबार करणारा बाळा गाडे अद्याप फरार आहे. अमित लकडे यांचे दाजी उमेश जालिंदर शिंदे आणि गणेश सूर्यवंशी यांनी अभय भालके याच्याविरुद्ध ११२ वर पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून आरोपींनी अमित लकडे यांना मारहाण केली.
ते पळत घराजवळ गेले, त्यावेळी सर्वांनी त्यांना पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. बाळा गाडे याने त्यांच्या दिशेने गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, विशाल जाधव यांना माहिती मिळाली की, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अक्षय भालके, गणेश भालके हे चैत्रबन वसाहतीतील एका पडक्या घरामध्ये लपून बसले आहेत.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या घराला वेढा देऊन आरोपींना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवा डोलारे याला बोपदेव घाट येथून ताब्यात घेऊन अटक केली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, हवालदार गायकवाड, पोलीस अंमलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, विशाल जाधव, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, आशिष गायकवाड यांनी पार पाडली आहे.
