मारहाण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नवीन घेतलेला फ्लॅट पाहण्यासाठी आणि चहासाठी बालमैत्रिणीने बोलावले होते. तो गेल्यावर तिच्या पती व इतरांच्या सहाय्याने त्याला मारहाण करून बाथरूममध्ये डांबून ठेवले. खंडणी उकळण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून संदेश पाठवला. कोंढवा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शोध घेऊन चार तासांत या तरुणाची सुटका करून चौघांना जेरबंद केले.
प्रवीण जगन्नाथ लोणकर (वय ३९, रा. कोंढवा खुर्द) हे सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोनल ऊर्फ सोनी कापरे ऊर्फ कटके ऊर्फ अतुल रायकर (वय ३५, रा. सनश्री सनटेक सोसायटी, एनआयबीएम रोड, कोंढवा खुर्द), अतुल दिनकर रायकर (वय ३८), रॉबीन ऊर्फ रवी मंडल (वय २४, रा. कोंढवा खुर्द) आणि सुरेश ऊर्फ कुरेश कुमारस्वामी हान (वय ३१, रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील प्रवीण लोणकर यांना त्यांची बालपणीची मैत्रीण सोनल ऊर्फ सोनी रायकर हिने मंगळवारी सायंकाळी तिचा एनआयबीएम रोडवरील फ्लॅट पाहण्यासाठी आणि चहासाठी बोलावले.
लोणकर घरी जाताच त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून त्यांना जखमी केले. त्यावेळी तिचा पती अतुल रायकर व इतर साथीदार फ्लॅटच्या बाहेर दबा धरून बसले होते. त्यांच्या मदतीने सोनी हिने प्रवीण लोणकर यांना मारहाण करून त्यांच्या तोंडात बोहा कोंबला.
त्यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना बाथरूममध्ये डांबून ठेवले. त्यांच्याकडून एटीएम कार्ड व मोबाईल काढून घेतले. त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर मेसेज केला की, ‘‘घरातील दागिने व पैसे काढून ठेव. मी एकाला आपल्या घरी ते घेऊन येण्यासाठी पाठवत आहे.’’
हा मेसेज पाहून त्यांच्या पत्नीला शंका आली. त्यांनी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. परंतु व्हिडिओ कॉल आला नाही. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली.
यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख यांना कळविले.
प्रवीण यांच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण, सुकेशिनी जाधव, राकेश जाधव यांच्यासह तपास पथकाचे अंमलदार लक्ष्मण होळकर, सूरज शुक्ला यांनी त्यांचा शोध घेतला.
त्यानुसार एनआयबीएम रोडवरील सनश्री सनटेक सोसायटीतील एका फ्लॅटमधून डांबून ठेवलेल्या प्रवीण लोणकर यांची सुटका करण्यात आली. आरोपींविरुद्ध खंडणी व अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत रवानगी दिली आहे.
ही कामगिरी अप्परपोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, सूरज शुक्ला यांनी पार पाडली.
