पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), अफू बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडांचा चुरा व अफू असे एकूण ५ लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अर्जुन सुखराम काला (वय ३१, रा. शिक्षकनगर, येवलेवाडी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथक येवलेवाडी भागात गस्त घालत असताना काला याच्याकडे अफूच्या बोंडांचा चुरा आणि अफू असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचून कालाला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेत १ किलो ७२८ ग्रॅम अफूच्या बोंडांचा चुरा तसेच ५८ मिलिग्रॅम अफू आढळली.
काला याने अमली पदार्थ कोठून आणले व कोणाला विकणार होता, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार संदीप शिर्के, विशाल दळवी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, स्वप्नील मिसाळ यांनी केली.
