जावयाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगून महिलेला लुबाडले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सुनेने बलात्काराची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे, तुम्हाला अटक होईल, अशी भीती दाखवून अहिल्यानगर येथील एका शेतकऱ्याकडून ६ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तोतया महिला वकिलाने अशाच प्रकारे आणखी एका महिलेला लुबाडल्याचे उघडकीस आले आहे.
स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२, रा. लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तोतया महिला वकिलाचे नाव आहे. याबाबत एका ५४ वर्षांच्या महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुलाला घटस्फोट मिळवून देण्याचे आमिष स्नेहल कांबळे हिने एका शेतकऱ्याला दाखवले. त्यासाठी त्याच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर सुनेने बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल केला असल्याचे खोटे सांगून, “पोलीस तुम्हाला अटक करतील,” असे सांगत पोलीस व कोर्टात देण्यासाठी पैसे मागून त्यांच्याकडून ५ लाख ९४ हजार रुपये वसूल केले होते.
त्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी फिर्यादीकडून १५ हजार रुपये स्वीकारताना स्नेहल कांबळे हिला रंगेहाथ पकडले. त्यानंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
तक्रारदार महिलेच्या जावयाविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे खोटेच कांबळेने या महिलेला सांगितले. याप्रकरणात त्यांना अटक करण्यात येणार आहे, न्यायालयाकडून अटक वॉरंट बजावण्यात येईल, अशी भीती दाखवून कांबळेने महिलेकडून वेळोवेळी १ लाख १३ हजार रुपये घेतले होते.
तिला अटक झाल्याचे व ती तोतया वकील असल्याचे समजल्यावर या महिलेने पुढे येऊन कांबळेने केलेल्या फसवणुकीची माहिती दिली. या प्रकरणाचा तपासपोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.
