ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६ कोटींचा गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सायबर गुन्हेगारीत शहरांच्या मर्यादा ओलांडत आता गावांतील युवकही गुंतले आहेत, याचे ठळक उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोकबन गावातील बांधकाम व्यावसायिक तुषार वाजंत्री. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी त्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ कोटी २९ लाखांची फसवणूक केली.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला, “तुमच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे” असा बनाव करून, सायबर चोरट्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली घरातच बसून राहण्यास भाग पाडले. चौकशीच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यांतील सर्व रक्कम विविध खात्यांत वळवण्यास सांगितले.
घाबरलेल्या नागरिकाने आपली संपूर्ण बचत, मुदत ठेवी, गुंतवणूक मोडून ६ कोटी २९ लाख रुपये सायबर चोरट्यांना पाठवले. यानंतर फसवणुकीचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या २० लाख रुपयांच्या व्यवहाराचा मागोवा घेता आला. ही रक्कम ‘धावीर कन्स्ट्रक्शन’च्या नावावरील खात्यात जमा झाली होती.
हे खाते तुषार वाजंत्री याचे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने त्याच खात्यातून ९० लाख आणि २० लाखांच्या FD (मुदत ठेवी) केल्याची माहिती मिळाली.पोलिस आपल्या मागावर असल्याची खबर लागताच वाजंत्री कोकबन येथून पसार झाला. मात्र, पनवेलमधील मोर्बे गावात तो लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या तपासात त्याच्याविरोधात राष्ट्रीय सायबर पोर्टलवर ५ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यवाहीत वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासो चव्हाण, जान्हवी भडेकर, संदिप पवार, संदिप यादव, सचिन शिंदे, सतिश मांढरे यांनी सहभाग घेतला.
