अंगठी, वेडणी, कॉइन नेले दोन महिन्यात चोरुन, विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानातील एका सेल्समनने तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे सोनं चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एप्रिल ते मे २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत घडला. विश्रामबाग पोलिसांनी प्रतिक नगरकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी नितीन इरप्पा डांगे (वय ३५, रा. सांगवी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. चोरीचा प्रकार १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक नगरकर हा नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून कार्यरत होता. त्याच्याकडे अंगठी, सोन्याची नाणी आणि वेडण्यांच्या काऊंटरची जबाबदारी होती. त्याने दररोज थोडं थोडं सोनं चोरुन नेलं व त्याचं लेबल दुकानातच ठेवून इतर वस्तू विकल्याप्रमाणे नोंद ठेवत होता. त्यामुळे चोरी लक्षात आली नाही.
२६ मे रोजी स्टॉक तपासणीदरम्यान मालक नितीन डांगे यांना संशय आला. त्यांनी सविस्तर स्टॉक तपासला असता तब्बल ४ कोटी ५८ लाखांहून अधिक रकमेचे सोने गायब असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे हे करत आहेत.
