महिलेला घातला पावणे बारा लाखांचा गंडा : आरोपीने स्वतः मेल्याचा केला बनाव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जीवनसाथी या मॅट्रिमोनी साईटवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, “शेअर मार्केट शिकवतो,” असे सांगत डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत खाते उघडण्यास लावून तिला ११ लाख ७४ हजार रुपयांना गंडवले आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव केला आहे.
याबाबत सहकारनगर येथील ४४ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्ष भार्गव या नावाने जीवनसाथी या वेबसाईटवर प्रोफाइल तयार करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२४ ते २७ मार्च २०२५ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने जीवनसाथी या विवाहविषयक वेबसाईटवर नाव नोंदवले होते. त्यावरून हर्ष भार्गव या नावाने ओळख वाढवून त्याने लग्नाचे आमिष दाखवले.
त्यानंतर, “मी शेअर मार्केट शिकवतो,” असे सांगून तिच्या नावाने डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत ऑनलाइन खाते उघडायला लावले. त्या बँक खात्याला त्याने स्वतःचा मोबाईल नंबर लिंक करून घेतला.
त्या खात्यावर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीकडून एकूण ११ लाख ७४ हजार ४२० रुपये पाठवायला लावले. तसेच फिर्यादी यांच्या नावावर मनाप्रमाणे एकूण १३ लाख १९ हजार २१० रुपयांचे मणप्पुरम गोल्ड लोन घेतले.
हे लोन परत केले नाही आणि फिर्यादीशी लग्नही केले नाही. नंतर एका प्रोजेक्टसाठी परदेशात जात असल्याचे सांगून स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. फकीर करत आहेत.
चॅटमधील स्पेलिंग मिस्टेकमुळे भांडाफोड
हर्ष भार्गव नाव सांगणाऱ्या व्यक्तीने नंतर दुसऱ्या नावाने फिर्यादीशी संपर्क साधून, “हर्षचा परदेशात अपघाती मृत्यू झाला आहे,” असे सांगितले. मात्र, त्याने सांगितलेल्या मृत्यूच्या तारखेच्या नंतरही जवळपास ७ दिवस तो फिर्यादीशी दुसऱ्या नावाने चॅट करत होता. हर्ष चॅट करताना स्पेलिंगमध्ये जे चुका करत असे, त्याच चुका दुसऱ्या नावाने चॅट करणारा व्यक्तीही करत होता. यावरून “हा दुसरा कोणी नसून, फसवणूक करणारा तोच हर्ष आहे,” याची खात्री फिर्यादीला पटली.महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
