फी म्हणून गिफ्ट पाठविल्याचे सांगून केली ४ लाखांची फसवणूक, धनकवडीमधील घटना
पुणे : व्हॉट्सअॅपवर कॉल करून भविष्याविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर, त्या महिलेने नकार दिला असतानाही, संबंधित व्यक्तीने गिफ्ट पाठविल्याचे भासवले. गिफ्टमध्ये पाऊंड्स असल्याचे सांगून, पेनल्टीच्या नावाखाली त्या महिला ज्योतिषीची ३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. दुसऱ्याला भविष्याविषयी सल्ला देणाऱ्या या महिला ज्योतिषीला, या अनुभवातून स्वतःच्या भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे मात्र समजू शकले नाही.
याबाबत धनकवडीतील एका ४३ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांना इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने रिक्वेस्ट पाठवून भविष्याविषयी माहिती विचारली. त्यांचा ज्योतिषाचा व्यवसाय असल्याने त्यांनी संपूर्ण माहिती दिली.
त्यानंतर आठवड्यानंतर त्या व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर मेसेज करून विचारले, “तुम्ही मला एवढी माहिती दिली, तुम्हाला फीच्या स्वरूपात काय हवे आहे?” त्यांनी “काहीही नको,” असे सांगितले. तरीही त्याने, “मी तुम्हाला गिफ्ट पाठवतो,” असे सांगितले.
त्यांनी पुन्हा नकार दिला. त्याने गिफ्टसाठी मोबाईल, पर्स, परफ्युम, नेकलेस अशा विविध वस्तूंचे फोटो पाठवले. तरीही त्यांनी गिफ्ट नको, असेच सांगितले. “माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्यामुळे आम्हा दोघांकडून गिफ्ट आहे,” असे सांगून त्याने पत्ता घेतला.
त्यानंतर कस्टमर केअर मोबाईल नंबरवरून एका महिलेचा कॉल आला. तिने सांगितले की ती दिल्लीहून बोलत आहे आणि व्हिक्टरने पाठवलेले पार्सल दिल्ली एअरपोर्टवर आले आहे. त्या पार्सलमध्ये २०,००० पाऊंड्स असल्याचे सांगून, पार्सल चार्जेस किंवा पेनल्टी भरावी लागेल, असे सांगितले.
महिला ज्योतिषीने व्हिक्टरला फोन केला असता, त्यानेही “तुम्हाला फी म्हणून २०,००० पाऊंड्स पाठवले आहेत,” असे सांगितले. त्यानंतर त्या कस्टमर केअर महिलेनं सांगितले की, रक्कम जास्त असल्याने तुम्हाला २९,७०० रुपये पेनल्टी भरावी लागेल.
त्यांना रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड यांच्याकडून मेल आला होता. त्या मेल आयडीवर सांगितले होते की २०,००० पाऊंड्स म्हणजे भारतीय रुपयांत २१,५४,१९९ रुपये होतात.पेनल्टी म्हणून “इनकम टॅक्स रिफ्लेक्शन अॅथोरायझेशन टॅक्स चार्जेस फॉर अकाउंट” अशा विविध कारणांनी त्यांच्याकडून एकूण ३ लाख ७० हजार रुपये भरायला लावले.
त्यानंतरही पार्सल न मिळाल्याने त्यांनी पुन्हा व्हिक्टरला फोन केला. त्याने सांगितले की तोही कस्टमर केअरला कॉल करत आहे, पण त्यांचा कॉल लागत नाही. तेव्हा त्या महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर करत आहेत.
