आणखी एक हुंडाबळी : कमी हुंडा दिल्यामुळे होत होता छळ, पतीला अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हुंड्यासाठी मारहाण करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच, आणखी एका विवाहितेला हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आपला प्राण गमवावा लागला. केसनंद येथील विवाहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्वाती सुरज पाठक (वय २३, रा. केसनंद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ मार्च ते ७ जून २०२५ दरम्यान घडला आहे.
ती सुरज पाठक (वय २६, रा. केसनंद) याला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच सासू सुनिता पाठक (वय ४५), दीर नीरज पाठक (वय २३, सर्व रा. केसनंद), मामा अरुण उपाध्याय (वय ४५, रा. लोहगाव) आणि मामा अरविंद उपाध्याय (रा. केसनंद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पाठक हा अन्नपदार्थ पुरविण्याचे काम करतो. फिर्यादी यांची मुलगी स्वाती व सुरज पाठक यांचा ६ मार्च २०२४ रोजी विवाह झाला होता. लग्नात ५ लाख रुपये व सोन्याचे दागिने देण्याची मागणी करण्यात आली होती.
फिर्यादी यांनी लग्नात १ लाख रुपये आणि ७ तोळे सोन्याचा हुंडा दिला होता. मात्र, मागणीप्रमाणे हुंडा दिला नसल्यामुळे स्वातीला सतत मारहाण व मानसिक त्रास दिला जात होता.
स्वातीच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती व सासूने गहाण ठेवून पैसे घेतले.
हे सोने सोडवण्यासाठी तिच्याकडे ३ ते ४ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी ३ लाख रुपये दिले. तरीही स्वातीवर घरगुती कारणांवरून वाद घालून शारीरिक व मानसिक छळ सुरुच होता.
७ जून रोजी सर्वांनी मिळून तिला मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून स्वातीने मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.हा तपास वाघोली पोलीस अधिक करत आहेत.
