प्रतीक खारगेची यशोगाथा : प्रशिक्षणादरम्यान आजारावर मात करत ‘ए ग्रेड’ने यश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : भूम नगरपालिका कंत्राटी कामगार असणारे संतोष खारगे यांचा मुलगा प्रतीक पोलीस अंमलदार झाला आहे. आई घरकाम करून शहरातील गुरुदेव दत्त हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन बनवण्याचे काम करतात.
सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पोलीस पदावर लेखी परीक्षेत 97 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आणि पोलीस म्हणून धाराशिव येथे रुजू झाला.
त्यानंतर प्रशिक्षणासाठी प्रतीकची निवड पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभूळगाव (लातूर) येथे झाली. ९ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर, मे महिन्यात प्रशिक्षणादरम्यान निमोनियासारख्या गंभीर आजारावर मात करत त्याने केवळ दोन दिवसांत मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिली.
त्यामध्ये 1320 पैकी 1070 गुण मिळवत त्याने प्रशिक्षण ए ग्रेड ने पूर्ण केले. दिनांक 09 जून 2025 रोजी दीक्षांत संचलन पार पडले आणि प्रतीकने राष्ट्रसेवेची शपथ घेतली. यावेळी आई सारिका, वडील संतोष खारगे, चुलते धनंजय खारगे, भाऊ प्रथमेश, आत्या अनिता बाबर व साधना भुजबळ, मामा रवी शिंदे, आतेभाऊ आशिष बाबर व अनिकेत भुजबळ तसेच आतेआजी नंदा आसलकर उपस्थित होते.
प्रतीकने समारंभावेळी शपथ घेतली तेव्हा उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे प्रतीकने अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर चीज केले आणि “प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ही म्हण सार्थ ठरवली. प्रतीकचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आहे.
