महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिपाली युवराज सोनी (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला असून जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) गंभीर जखमी झाले आहे.
जगदीश सोनी व दिपाली सोनी हे दुचाकीवरून जात होते. चौकात सिग्नल सुटल्यावर पुढे त्यांनी दुचाकी हळू केल्यावर मागून आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे महिलेच्या अंगावरून ट्रक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर जखमी पुरुषला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती देताना मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांनी सांगितले की, “या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तपास सुरु आहे.”
गंगाधाम चौक हा सतत अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. अपघातानंतर काही काळासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात येते, मात्र काही दिवसांनी ती उठवली जाते. आई माता मंदिर ते मार्केटयार्ड रस्त्यावर पायाभूत सुविधांचा अभाव असून गंगाधाम चौकाकडे जाणाऱ्या उतारामुळे वारंवार अपघात घडतात.
महापालिकेने या उतारात सुधारणा करण्यासाठी स्पीड बंप आणि रॅम्बल स्ट्रिप्स बसवण्याची योजना जाहीर केली असली तरी रस्ता रुंदीकरणासाठी होणाऱ्या अतिक्रमण हटविण्यावर अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत.
स्थानिक रहिवाशांची मागणी – या रस्त्यावर दिवसाच्या वेळेत जड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा सातत्यपूर्ण पाठपुरावा – गंगाधाम चौकातील अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने अनेक वेळा आवाज उठवला आहे. आई माता मंदिर ते मार्केटयार्ड दरम्यान सरळ रेषेत उड्डाणपूल करण्याची मागणी वारंवार बातम्यांद्वारे करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने हा उड्डाणपूल सरळ न करता बिबवेवाडी–कोंढवा रस्त्यावर वळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गंगाधाम चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे.
