भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आवळल्या रिक्षाचालकाच्या मुसक्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर धबाडी येथे एका महिलेच्या डोक्यात तीव्र हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आला होता. २० मे रोजी रात्री ९ वाजता घडलेल्या या खुनाचा काहीही सुराग लागत नव्हता. त्यावेळी जोरात पाऊस पडत असल्याने रात्रीचा अंधार, रस्त्यावरील अपुरा उजेड यामुळे परिसरातील ७० हून अधिक सीसीटीव्हीमध्ये ओळखता येईल असे काहीच दिसत नव्हते.
एका खासगी संस्थेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस पाहणी करत होते. त्यात अचानक वीज चमकल्याचे दिसले. वीज चमकल्याने पसरलेल्या प्रकाशात खून झालेली महिला एका रिक्षामध्ये बसलेली दिसून आली.
याच एका धाग्याच्या आधारावर भारती विद्यापीठ पोलिसांनी पार उत्तर प्रदेशात जाऊन रिक्षाचालक खुन्याला जेरबंद केले. शाहरुख शकील मन्सूर (वय २७, रा. सय्यदनगर, इनामदार स्कूलजवळ, हडपसर, मूळ रा. अमखेरा, शहाजपूर, धामपूर, बिजनौर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
संबंधित महिला देहविक्री करत असल्याचे तपासात समोर आले असून, तिच्याकडील पैशांसाठी शाहरुख मन्सूरने तिचा खून करून तिची पर्स लंपास केली. शाहरुखविरुद्ध यापूर्वी जबरी चोरीचे ५ गुन्हे दाखल आहेत.
बोपदेव घाटात त्याने एकाला लुटले होते. हडपसर परिसरात ३ आणि कोंढवा पोलीस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील अंमलदारांनी महिलेच्या मोबाईल नंबरवरून तांत्रिक विश्लेषण करून तिच्या हालचालींचा मागोवा घेतला.
सदर महिला कोल्हेवाडीवरून दुचाकीवर नवले पुलापर्यंत आली होती, हे १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून समोर आले. नवले पुलाजवळील एका आस्थापनाचे सुमारे ७० सीसीटीव्ही कॅमेरे तपासताना अनेक अडचणी आल्या.
त्यातील एका खासगी आस्थापनातील सीसीटीव्ही पाहताना वीज चमकली व त्यात ही महिला एका रिक्षामध्ये बसलेली दिसून आली. या फुटेजवरून ती रिक्षा टीव्हीएस कंपनीची असून, तिच्या मागील हुडचा रंग पूर्णतः काळा असल्याचे समजले.
या रिक्षाचा शोध घेण्यासाठी आरटीओकडून टीव्हीएस कंपनीच्या पुणे शहरातील १०,७९४ रजिस्टर रिक्षांची माहिती मिळवण्यात आली. त्यापैकी १२०० रिक्षांवर वाहतूक विभागाकडून दंडात्मक कारवाई झाली होती.
त्या चलनावरून संबंधित रिक्षांचे पुढील व मागील फोटो मिळाले.रिक्षेची खातरजमा करण्यासाठी नवले पुलापासून कात्रजकडे जाणाऱ्या मार्गावरील १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्यातून या खुनामागे शाहरुख मन्सूर असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे आढळले.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांचे सहकारी उत्तर प्रदेशात गेले. पुणे ते अमखेरा, शहाजपूर, धामपूर, बिजनौर असा तब्बल ३२०० किमीचा प्रवास करून शाहरुख मन्सूर याला ९ जून रोजी धामपूर येथे अटक करण्यात आली.
या खुनाचा तपास करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळ, कोल्हेवाडी, नांदेड सिटी, नवले पूल, वंडरसिटी परिसरातील सुमारे ३२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली.
१२०० टीव्हीएस कंपनीच्या रिक्षांची तपासणी व १५० रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी करून आरोपीला शोधून काढण्यात यश आले. ३२०० किमी प्रवास करून आरोपीला अटक करण्यात आली असून, अत्यंत गुंतागुंतीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपास कार्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमोडे तसेच आंबेगाव पोलीस ठाण्याचे धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी सहभाग घेतला.
