‘पहाट’ अंतर्गत कारंबा येथे स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मा. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी ‘पहाट’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कारंबा येथे स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी एका महिन्याच्या अथक प्रयत्नातून हे वाचनालय उभारले. वाचनालयासाठी कारंबा येथील विनायक सुतार यांनी हॉल उपलब्ध करून दिला. तसेच, नागपूर येथील ‘माऊली सेवा मित्र मंडळ’ व स्व. मीरा मनोहरराव व्याघ्र यांच्या स्मरणार्थ सुहास खरे यांनी वाचनालयासाठी पुस्तके पुरवली.
मोहन मनोहर व्याघ यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत दिली. या वाचनालयाचे उद्घाटन मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते ११ जून २०२५ रोजी करण्यात आले.
यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी मा. संकेत देवळेकर, सोलापूर ग्रामीण; पोनि. राहुल देशपांडे; सहाय्यक पोनि. सोमनाथ कदम; पोउनि. महेश घोडके; सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार; विनायक सुतार; गावातील नागरिक; विद्यार्थी; सुहास खरे व माऊली सेवा मित्र मंडळ नागपुर चे सदस्य उपस्थित होते.
