पुणे रेल्वे स्टेशनसमोर भरदिवसा डिलिव्हरी बॉयला लुटले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मुंबईतील शाखेतून पुण्यातील शाखेत सोन्याचे दागिने पोहोचविण्यासाठी आलेल्या कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची ८ पार्सल जबरदस्तीने चोरून नेली.
याबाबत कुरिअर कंपनीचे मॅनेजर प्रथमेश माने (वय २८, रा. अंधेरी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोर बुधवार, ११ जून रोजी सकाळी सव्वानऊ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठारी अॅण्ड कोठारी कंपनीच्या मुंबई शाखेतून ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली ८ पार्सल पुण्यातील शाखेत पोहोचविण्यासाठी कुरिअर कंपनीकडे देण्यात आली होती.
कंपनीचा कर्मचारी ही पार्सल घेऊन मुंबईहून रेल्वेने पुण्यात आला. तो पुणे रेल्वे स्टेशनला उतरून स्टेशनबाहेर आल्यानंतर त्याच्या कमरेला दोघा जणांनी पिस्तुल लावले. त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील ८ पार्सल जबरदस्तीने काढून घेतली.
घाबरलेल्या या कर्मचार्याने हा प्रकार मॅनेजर प्रथमेश माने यांना कळवला. ते तातडीने पुण्यात आले आणि त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुणे रेल्वे स्टेशनसमोरील सीसीटीव्हीमध्ये या कर्मचाऱ्याच्या शेजारी दोघेजण दिसत आहेत.
त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेला दिसत आहे. आरोपींचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.
