दारू विक्री सुरू असताना काळेपडळ पोलिसांनी टाकला छापा : ४ लाखांचा माल जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हांडेवाडी रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगसमोर लोकांना दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. तेथे एकाला पकडून, तेथील ५१ कॅन व १ बॅरलमध्ये भरून ठेवलेली ४ लाख १३ हजार रुपयांची २०६५ लिटर गावठी दारू जप्त केली आहे.
नवीन दिलीप बिनावत (वय ५४, रा. सातवनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचा पुरवठा केला जातो, त्यावर पोलीस सातत्याने कारवाई करत असतात.
काळेपडळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की कंजारभाट वस्ती, संतोषनगर येथील बांधकाम चालू असलेल्या बिल्डिंगजवळ एक जण दारूचा साठा करून लोकांना दारू विक्री करत आहे.
त्याआधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेव्हा नवीन बिनावत याने त्या ठिकाणी ५१ कॅन व एका बॅरलमध्ये २०६५ लिटर गावठी दारू साठवून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी ४ लाख १३ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. नवीन बिनावत याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही दारू यवत येथून आणल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रविण कांबळे, परशुराम पिसे यांच्या पथकाने केली आहे.
