हरवलेला अल्पवयीन मुलगा पुणे येथे सापडला
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : दिनांक ०८ जून २०२५ रोजी हर्ष योगेश शर्मा (वय १३ वर्षे, रा. देशमुख प्लॉट, मल्लीकार्जुन मंदिराजवळ, बार्शी) हा सकाळी ६.३० वाजता घरासमोर सायकलवरून खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. पालकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे अत्यंत घाबरून त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलीस ठाण्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गु.र.नं. ४९५/२०२५ भा.दं.वि. कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवला. तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे यांच्याकडे सोपवण्यात आली.
पोलिसांनी तात्काळ चार पथके तयार करून बार्शी शहर परिसरात शोधमोहीम सुरू केली.तपासादरम्यान हर्ष हा बार्शी रेल्वे स्थानकावर सायकलसह गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तो रेल्वेने इतरत्र गेल्याची शक्यता लक्षात घेऊन लातूरच्या दिशेने पांगरी, येडशी, रामलिंग, धाराशिव, लातूर तसेच कुडूवाडी, पंढरपूर, मिरज आणि कोल्हापूर या भागांत शोध पथके रवाना करण्यात आली.
हरवलेल्या मुलाची माहिती, फोटोसह शोधपत्रिका तयार करून ती जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस ठाणे, रेल्वे कर्मचारी संघटना व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. या व्यापक प्रसिद्धीमुळे सदर मुलगा पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीसांना सापडला.
शेवटी, पोलीसांच्या तत्पर आणि परिमाणकारक कारवाईमुळे हरवलेला अल्पवयीन मुलगा सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीण चे मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सपोनि प्रदीप झालटे, पोहेकॉ विश्वजीत ठोंगे, प्रमोद केकान, बाबासाहेब घाडगे, पोना संगप्पा मुळे, पोकॉ प्रविण शहाणे, अविनाश पवार व बार्शी शहर गुन्हे शाखा पथक यांच्या सहकार्याने पार पडली.
