डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिक व कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधी, हिंजवडी, माण व मारुंजी येथील सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी उपस्थित सर्व विभागीय अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. “PMRDA ही यंत्रणा नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि हिंजवडी-माण-मारुंजी परिसराचा विकास गतीमान करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या बैठकीद्वारे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत PMRDA प्रशासनाने विविध पातळ्यांवर तातडीची कृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येत्या काळात या उपाययोजना प्रत्यक्षात राबवल्या गेल्यास परिसरातील नागरिकांना निश्चितच दिलासा मिळेल.
बैठकीत कोणत्या-कोणत्या प्रमुख समस्यांवर चर्चा झाली –
» पाणी साचण्याची समस्या : मुख्य रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या जलसंचयामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून PMRDA तर्फे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून वॉटर पंपिंग वाहनांची तात्काळ व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.
» रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती : पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे तात्काळ दुरुस्तीचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून नागरिकांना प्रवास करताना त्रास होणार नाही.
» कचरा व्यवस्थापन आणि डेब्रिस हटवणे : प्रभागातील सार्वजनिक जागांमध्ये साचलेला कचरा व बांधकामाचे डेब्रिस सात दिवसांच्या आत पूर्णतः हटवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
» अनधिकृत बांधकामांवर कारवाई : नैसर्गिक नाल्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करत अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
» सांडपाणी व्यवस्थापन : हिंजवडी परिसरातील काही कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट बाहेर टाकले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला.
» वाहतूक नियोजन आणि स्ट्रीट लाईट दुरुस्ती : रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक नियोजन करण्याचे तसेच बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट्स तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
