सुखसागर परिसरातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गंगाधाम चौकामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता तर एक जण जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच कात्रजमधील सुखसागर नगर परिसरात यशश्री सोसायटीसमोर पायी चाललेल्या तरुणीला भरधाव टुरिस्ट व्हॅगन (आर कार) ने जोरात धडक दिली.
या अपघातात श्रेया गौतम येवले (वय २१, रा. शीतल हाइट्स, खंडोबा मंदिर जवळ, कोंढवा, पुणे) हिचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडला.
कार चालकाने मुख्य रस्त्यावरून थेट फुटपाथवर गाडी घातली. यावेळी त्याने नारळाचे झाड तोडत समोरून पायी येणाऱ्या तरुणीला जोरदार धडक दिली. समोर असलेल्या बदामाच्या झाडामध्ये कार अडकली आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ, बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे.
कार चालक सतीश गुरुनाथ होनमाने (वय ३७, रा. गोकुळनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीसाठी त्यालाही ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी गाडीत आणखी एक जण होता, जो अपघातानंतर पळून गेला.
त्याचा शोध भारती विद्यापीठ पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली असून वाहनचालकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


















