सायबर चोरट्यांचा नवा फंडा : महिलेला ७ लाखांचा गंडा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या नावाने ट्रॅफिक दंडाचे चलन असल्याचे भासवून एपीके फाईल पाठवून लोकांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवण्याचा व त्यातून बँक खाती रिकामी करण्याचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी सुरू केला आहे. या प्रकारात एका महिलेला सायबर चोरट्यांनी ७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत जांभुळवाडी येथे राहणाऱ्या ३३ वर्षांच्या महिलेनं आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींना एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरून “RTO Traffic Challan 500” या नावाने एपीके फाईल पाठवण्यात आली.
आपल्याला वाहतूक नियम भंगाबाबत चलन आले आहे, असे वाटून त्यांनी त्या फाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल झाले. त्यानंतर लगेच त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरट्यांनी घेतला.
मोबाईल बँक खात्याशी जोडलेला असल्याने त्यांच्या नावाने ६ बँक खाती उघडून त्यातून ७ लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे. आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
