शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थी, शिक्षक शाळेबाहेर ताटकळले : संस्थाचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : संपूर्ण राज्यात मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवशी त्यांचे वाजत-गाजत, उत्साहात स्वागत केले. असे असताना, शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात एका संस्थापकाने शाळा कायमची बंद असल्याचा बोर्ड लावून शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे त्या माध्यमिक शाळेतील १७९ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणाला मुकावे लागले. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवता आले नाही.
संस्थेवर प्रशासक नेमल्यानंतर त्याला कोणतेही सहकार्य न करता, शाळेच्या पहिल्या दिवशी मुनोत माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य गेटला, कार्यालयास व वर्गांना कुलूप लावून विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकाला आत प्रवेश करण्यास अटकाव केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शाळेचे दरवाजे न उघडता व कोणालाही शाळेत प्रवेश दिला गेला नाही. याबाबत प्रशासक सुनील विठ्ठलराव गच्चे (वय ५७, रा. मंगळवार पेठ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी अंबरचंदानी मुनोत शिक्षण संस्था अंतर्गत झुंबरबाई मुनोत माध्यमिक विद्यालय, कात्रज या शाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, मुलगी हर्षदा मुनोत, मुलगा निखिल मुनोत, निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील गच्चे हे जिल्हा परिषदेत उपशिक्षण अधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत आहेत. त्यांची शासनाने मुनोत शिक्षण संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केलेली आहे.
२९ नोव्हेंबर २०२४ रोजी ते कात्रज कोंढवा रोडवरील शाळेत प्रशासक म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी गेले असता, अशोक मुनोत व मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांनी शासनाचा आदेश मान्य करण्यास नकार दिला.
त्यांना शाळेतून परत पाठवले. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून हा प्रकार कळविण्यात आला. मुख्याध्यापिका सुरेखा सुतार या प्रशासकीय कामात कोणतेही सहकार्य करीत नसल्यामुळे त्यांना नोटीस देऊन ११ फेब्रुवारी २०२५ रोजी निलंबित करण्यात आले.
सोमवारी दि. १६ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेचा पहिला दिवस होता. मुनोत माध्यमिक शाळेत इयत्ता ८ वी ते १० वी या वर्गांमध्ये एकूण १७९ विद्यार्थी शाळेत येणार होते. मात्र, शाळेचे संस्थापक अध्यक्ष अशोक मुनोत, त्यांची मुलगी हर्षदा मुनोत, मुलगा निखिल मुनोत व निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांनी शाळेच्या गेटवर फ्लेक्स बोर्ड लावून, “ही शाळा कायमची बंद” असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना, त्यांचे पालक व शिक्षक यांना शाळेत प्रवेश दिला नाही.
ही बाब समजल्यावर फिर्यादी प्रशासक, शिक्षण उपसंचालक सुनंदा वाखारे, भाऊसाहेब कारेकर, धनंजय परदेशी, शंकर मांडवे, जयेश शेंडकर असे शिक्षण विभाग व महापालिकेचे विविध अधिकारी दुपारी १२ वाजता शाळेच्या गेटवर पोहोचले.
त्यांनी अशोक मुनोत यांना, “शाळेचे गेट उघडा, विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षण घेऊ द्या, शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू द्या. तुम्ही असे बेकायदेशीरपणे वागत आहात, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. मी शासनाने नेमलेला प्रशासक आहे, तुम्हाला माझे आदेश पाळावे लागतील,” असे समजावून सांगितले.
तरीही त्यांनी शाळेच्या मुख्य गेटला लावलेले कुलूप काढून मुलांना व शिक्षकांना शाळेत प्रवेश दिला नाही. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्यांनी शाळेचे दरवाजे न उघडता कोणालाही प्रवेश दिला नाही.
शेवटी प्रशासकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात शाळेचे कुलूप काढून आत प्रवेश करण्याचा प्रशासक प्रयत्न करीत आहेत, मात्र संस्थापकाने अजूनही त्यांना दाद दिलेली नाही.
