विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून बार्शी शहर पोलिसांचा गौरव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या तांत्रिक, समन्वित व योजनाबद्ध तपासामुळे बार्शी–परंडा परिसरात कार्यरत असलेल्या मोठ्या अमली पदार्थ विक्री रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळाले आहे.
या उल्लेखनीय तपासकामाबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या हस्ते बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, अभयकुमार माकणे, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल माने यांचा गौरवपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
१७ एप्रिल २०२५ रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली परांडा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान अमली पदार्थ मॅफेड्रॉन (एम.डी.) विक्री करणाऱ्या टोळीवर छापा टाकण्यात आला.
यामध्ये तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २०.०४ ग्रॅम मॅफेड्रॉन, एक गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, मोबाईल फोन्स, वजन काटा, रोख रक्कम आणि टोयोटा कार असा एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपास अधिक खोलवर नेल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एकूण १३ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली असून, या सर्वांविरुद्ध एनडीपीएस कायदा, भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभयकुमार माकणे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे आणि पोहे अमोल माने, श्रीमंत खराडे, बाळासाहेब डबडे, पोना सागर सुरवसे अंकुश जाधव, राहुल उदार, प्रल्हाद आकुलवार, सचिन देशमुख, दत्ता सोमवाड, सायबर शाखेचे धनराज फत्तेपुरे, रतन जाधव यांचा मोलाचा सहभाग होता. या कारवाईमुळे अमली पदार्थविरोधी मोहिमेला बळकटी मिळाली असून, बार्शी पोलीस दलाच्या दक्षतेचे हे एक ठळक उदाहरण ठरले आहे.
