शंकरराव पाटील कनिष्ठ स्वतंत्र महाविद्यालय
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : शंकरराव पाटील कनिष्ठ स्वतंत्र महाविद्यालय, भूम येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय योग संगम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून योगाचे महत्त्व, तत्त्वज्ञान आणि शास्त्रीय पद्धतीने योगाभ्यास कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलप्रार्थनेने झाली. यानंतर योग प्रशिक्षक नागरगोजे मॅडम व क्रीडा शिक्षक प्रा. महेश सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्व समजावले. त्यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष योगाभ्यास करून घेतला.
योगसत्रात विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, भुजंगासन, त्रिकोणासन आदी योगासने शिकविण्यात आली. त्यानंतर कपालभाती प्राणायाम व ध्यानधारणा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायन केले.
या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय संतोष शिंदे सर, सर्व प्राध्यापकवृंद, एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगाच्या नियमित सरावातून शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते हा संदेश मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यासाची प्रेरणा निर्माण झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.
