कर्जाचे हप्ते न भरल्याने जप्त केलेली कार देण्याच्या आमिषाने फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कर्जाचे हप्ते न भरल्याने श्रीराम फायनान्स कंपनीने जप्त केलेली कार मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका एजंटाने चक्क पोलीस हवालदाराची ४ लाख रुपयांची फसवणूक केली.
फुरसुंगी येथे राहणाऱ्या पोलीस हवालदाराने याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी प्रथमेश संजय गुगळे (रा. साईनगर सोसायटी, सातववाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २८ मार्च ते २२ जून २०२५ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दररोज दुचाकीवरून प्रवास करणे त्रासदायक होत होते. पाठदुखी व कंबरदुखीमुळे त्यांनी चारचाकी गाडी घेण्याचे ठरवले.
त्यांच्या मित्राने लक्ष्मण गवंडगावे यांच्याकडे मारुती सुझुकी स्विफ्ट ही गाडी श्रीराम फायनान्स कंपनीने कर्जाचे हप्ते न भरल्याने जप्त केली असल्याची माहिती दिली. ही गाडी नसरापूर येथील श्रीराम फायनान्सच्या गोडाऊनमध्ये असल्याचे समजले.
ही गाडी प्रथमेश गुगळे व प्रफुल्ल उबाळे या एजंटांच्या नावावर बुक झालेली असल्याचे सांगितले गेले. गवंडगावेंनीही यांच्याकडून पूर्वी मारुती अल्टो विकत घेतल्याची माहिती दिली.
फिर्यादीने नसरापूरला जाऊन गाडी पाहिली. त्यांना ती गाडी आवडली.
प्रथमेशने गाडीची किंमत ४ लाख ८० हजार रुपये सांगितली. व्यवहार ठरवताना किंमत कमी करून ती ४ लाख २० हजार १२० रुपये ठरवण्यात आली. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे, नोटरी करून सर्व पैसे एजंट असलेल्या प्रथमेश गुगळे याला दिले. गाडीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी ते गुगळे याची वाट पाहत थांबले.
मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते गुगळे याच्या घरी गेले असता घराला कुलूप होते. त्याने आजी वारल्याचे कारण देत अहिल्यानगरला जात असल्याचे सांगून वेळकाढूपणा केला. त्याला थेट जाब विचारला असता, “तुम्ही दिलेले ४ लाख १९ हजार रुपये मी कंपनीत न भरता खर्च केले. पैसे परत करतो,” असे सांगितले.
तथापि, दोन महिन्यांनंतरही त्याने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर फिर्यादीने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एकीकडे गाडी मिळाली नाही आणि दुसरीकडे आर्थिक फसवणूकही सहन करावी लागली.
पोलीस हवालदाराने उसने पैसे घेतल्याने आता परतफेडीची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव करत आहेत.
