परीक्षेसाठी पर्यवेक्षक पुरविण्यासाठी मागितली होती ९० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांच्या नावाने सुरू असलेल्या अनंतराव पवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपप्राचार्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
अवधूत भिमाजी जाधवर (वय ५३) असे या उपप्राचार्याचे नाव असून त्यांच्याकडेच प्राचार्यपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.तक्रारदार हे खाजगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असून त्यांच्या इन्स्टिट्यूटमधून चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी बसलेले आहेत.
या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था, माळेगाव यांच्याकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. अवधूत जाधवर हे अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपप्राचार्य असून त्यांच्याकडे प्राचार्यपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
तक्रारदार यांनी संस्थेला पत्र देऊन त्यांच्या पॅरामेडिकल संस्थेच्या परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्याची मागणी केली होती. त्यानुसार, जाधवर यांनी चालू वर्षातील परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडून देण्यासाठी संस्थेच्या परीक्षेत बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये, असे एकूण ४५ विद्यार्थ्यांचे ९० हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यापैकी १० हजार रुपये त्यांनी अगोदरच घेतले. त्यानंतर जाधवर यांनी पर्यवेक्षक नेमण्याचे पत्र तक्रारदारास दिले. त्या पत्रानुसार पर्यवेक्षक येऊन तक्रारदाराच्या संस्थेतील परीक्षा सुरू झाली. परीक्षा सुरू असताना अवधूत जाधवर यांनी उर्वरित ८० हजार रुपयांची लाच देण्यासाठी तगादा लावला होता.
त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २३ जून रोजी प्राप्त झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने २३ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी अवधूत जाधवर यांनी सुरुवातीला ८० हजार रुपयांची लाच मागितली आणि त्यात तडजोडीनंतर ४० हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
यानुसार, मंगळवारी २४ जून रोजी तक्रारदार यांना बारामती येथील हॉटेल सिटी इन येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तक्रारदारांकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना अवधूत जाधवर यांना रंगेहाथ पकडले.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले करत आहेत.
