उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सोसायटीची स्थापना करून कन्व्हेन्स डीडद्वारे जमीन सोसायटीच्या नावावर करून घेण्यासाठी शासनाकडून मोहिम राबवली जाते. असे असताना उपनिबंधक कार्यालयात मात्र सोसायटीचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सभासदांच्या संख्येनुसार लाच घेतली जात असल्याचा प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड झाला आहे.
सोसायटीची नोंदणी करताना साडेसात हजार रुपये घेतले गेले होते. त्यानंतर सोसायटीच्या बाय लॉजचे बुकलेट देण्यासाठी ३ हजार ७०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून उपनिबंधक कार्यालयात सहकारी अधिकारी व उपनिबंधकाला रंगेहाथ पकडले.
सहकारी अधिकारी संगीता, सुभद्रा बाबुराव किरवले-चौधरी (वय ५०) आणि उपनिबंधक मुकुंद विमल भास्कर पवार अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही दापोडी येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात कार्यरत आहेत.
तक्रारदार पिंपरी-चिंचवड शहरातील एका सोसायटीत राहतात. त्यांच्या सोसायटीतील सर्व सदस्यांनी सोसायटी नोंदणीसाठी २५ मार्च रोजी दापोडीतील उपनिबंधक कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.
त्यावेळी उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी संगीता किरवले-चौधरी व मुकुंद पवार यांनी एका सभासदासाठी ७०० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार १६ सभासदांच्या सोसायटी नोंदणीसाठी ७०० रुपये प्रति सभासद या प्रमाणे ११ हजार २०० रुपयांची लाच मागण्यात आली होती.
त्यानंतर साडेसात हजार रुपये अगोदर घेण्यात आले. सोसायटीची नोंदणी करून त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. लाचेची संपूर्ण रक्कम मिळाली नसल्याने तक्रारदाराला उपविधी बुकलेट देण्यात आले नव्हते.
बुकलेट घेण्यासाठी तक्रारदार उपनिबंधक कार्यालयात गेले असता, अधिकारी किरवले-चौधरी आणि पवार यांनी तक्रारदाराकडे ३ हजार ७०० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी दापोडीतील उपनिबंधक कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून ३७०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा दोघांविरुद्ध दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा तपास पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ करत आहेत.
