अॅडव्हेंचर जंक्शनतर्फे यशस्वी मोहिम
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेशातील लाहौल जिल्ह्यातील 6,111 मीटर उंचीच्या माउंट युनम शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली. देशभरातून एकूण 30 अनुभवी गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यापैकी फक्त सात जणांनी शिखरावर पोहोचण्याची कामगिरी फत्ते केली. यामध्ये पुण्यातील कृष्णा मरगळे, मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे या तिघांचा समावेश होता.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही मोहिम आखली जात होती आणि त्यासाठी सातत्यपूर्ण शारीरिक व मानसिक तयारी करण्यात आली होती.
शिखरावर चढताना जवळपास -7 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागला. उंचीमुळे होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे गिर्यारोहकांसाठी ही मोहीम अत्यंत कठीण ठरली. मात्र ‘हर हर महादेव’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करत मराठमोळ्या गिर्यारोहकांनी अखेर हे हिमशिखर सर केले.
शिखरावर ऑक्सिजन पातळी केवळ 9.5 टक्के असल्याने श्वास घेणे कठीण होते. त्यामुळे इच्छाशक्तीबरोबरच जबरदस्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक होती. हळूहळू उंची वाढवत बॅकलमटायझेशन (उंचीशी जुळवून घेणे) करून मनाली, केलॉंग, भरतपूर अशा टप्प्यांवर मुक्काम करत एडव्हान्स बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्यात आले.
रात्री 2 वाजता मोहिमेला सुरुवात झाली आणि सकाळी 10 वाजता शिखर सर करण्यात यश मिळाले. या मोहिमेदरम्यान अचानक बदलणारे हवामान, बर्फवृष्टी, वादळ अशा विविध नैसर्गिक अडचणींना तोंड द्यावे लागले.
हिमाचा अंदाज न लागल्यामुळे पाय खोलवर जात होते. थंड पाण्यातून वाहणारे ओढे पार करत गिर्यारोहकांनी पाठीवर आवश्यक साहित्य घेऊन शिखराकडे एक-एक पाऊल टाकत यशाचे शिखर गाठले.
या मोहिमेत हरियाणाचे 2, उडीसाचा 1, पंजाबचे 2, दिल्लीचे 3, बिहारचा 1, बेंगळुरूचे 2, केरळचा 1, महाराष्ट्राचे 4, मनालीचे 2 आणि उत्तराखंडचे 2 असे एकूण 30 गिर्यारोहक सहभागी झाले होते. त्यापैकी 7 जणांनी शिखर सर केले.
उंचीमुळे निर्माण होणाऱ्या आजारांमुळे काही गिर्यारोहकांना मोहिमेतून माघार घ्यावी लागली. विशेषतः ऑक्सिजनच्या अभावामुळे होणाऱ्या हायपोक्सियासारख्या त्रासांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे उर्वरित पथकाचे मनोबल टिकवून ठेवणे हेही एक मोठे आव्हान होते, असे मानसिंह चव्हाण यांनी सांगितले.
