दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडले : ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ टेस्टला नकार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्याला पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान थांबवले. त्याची ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ टेस्ट करण्यास सुरुवात केल्यावर त्याने ती करण्यास नकार दिला आणि आरडाओरड करत “मी फाशी घेऊन जीवाचे बरेवाईट करतो”, अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर आढळून आले.
अरुण निवृत्ती सूर्यवंशी (वय ५०, रा. एरोली, नवी मुंबई), बाबुराव धर्माजी आंबेगावे (वय ५५, रा. सोमराणा, ता. उदगीर, जि. लातूर) आणि लक्ष्मण प्रल्हाद पाटील (वय ३९, रा. कदमवाक वस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलीस अंमलदार विजय राम सुतार यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार पुलगेट पोलीस चौकीसमोर २९ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलगेट पोलीस चौकीसमोर नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू होती.
त्यावेळी हा ठेकेदार आणि त्याचे दोन साथीदार कारमधून आले. त्यांनी दारू पिल्याचा संशय आल्याने पोलिसांनी ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अरुण सूर्यवंशी यांनी या कारवाईस नकार देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
नाकाबंदी दरम्यान कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांबरोबर वाद घालून त्यांच्या अंगावर धावून आले. हातवारे करत मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांना शिवीगाळ करत अरुण सूर्यवंशी यांनी, “मी स्वत:ला फाशी लावून जीवाचे बरेवाईट करून घेईन”, अशी धमकी दिली.
तो स्वतःच्या कमरेला हात लावत काहीतरी शोधत असल्याचे आढळल्याने, पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर आढळून आली. पोलिसांनी आर्म अॅक्ट तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा ठेकेदार असून त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचे लायसन्स आहे.
