दुसऱ्या मालाच्या कंटेनरमध्ये दक्षिण आफ्रिकेतून कॉपर स्क्रॅप पाठविल्याचा बनाव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एअरक्राफ्टचे स्पेअर पार्ट्स आयात-निर्यात करणाऱ्या पुण्यातील कंपनीला कॉपर स्क्रॅप देण्याचे आमिष दाखवून दक्षिण आफ्रिकेतील कंपनीने गुजरातमधील दुसऱ्या कंपनीच्या मालाच्या कंटेनरमध्ये कॉपर स्क्रॅप पाठविल्याची बनावट कागदपत्रे दाखवून ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पर्वती गावातील एका व्यावसायिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अॅन्टोनिओ ग्रॅबीन (रा. दक्षिण आफ्रिका) आणि एम. एस. टी. शिपिंग लॉजिस्टिक्स कंपनी (रा. दक्षिण आफ्रिका) यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २२ एप्रिल ते २७ मे २०२५ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एरोटेक प्रा. लि. या नावाने कंपनी असून, ते एअरक्राफ्टचे स्पेअर पार्ट्स आयात-निर्यात करतात. त्यांच्या कंपनीला कॉपर स्क्रॅपची गरज होती. त्यामुळे त्यांनी गुगल सर्च इंजिनवर कॉपर स्क्रॅपच्या आयातीबाबत माहिती शोधली.
त्यात फ्रू अँड सन्स होल्डिंग ग्रुप या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील कंपनीकडे कॉपर स्क्रॅप उपलब्ध असल्याचे आढळले. त्यांनी या कंपनीशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. त्यावर अॅन्टोनिओ ग्रॅबीन याने ही कंपनी त्याचीच असल्याचे सांगून कॉपर स्क्रॅपची माहिती आणि फोटो पाठवले.
त्यांच्यात ६९ लाख ६० हजार रुपयांचे २५ टन कॉपर स्क्रॅप खरेदी करण्याचा करार करण्यात आला. एकूण रकमेच्या ३० टक्के रक्कम म्हणून त्यांनी अगोदर १७ लाख ४० हजार रुपये कंपनीला पाठवले. ही रक्कम फ्रू अँड सन्स होल्डिंग ग्रुप या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली.
त्यानंतर वाहतुकीसाठी कंपनीने एम. एस. टी. शिपिंग लॉजिस्टिक्स या डर्बन येथील कंपनीचा संपर्क दिला. त्यानंतर त्यांनी ४० टक्के रकमेची मागणी केली. ही रक्कम न भरल्यास एम. एस. टी. शिपिंग लॉजिस्टिक्स कंपनी कस्टम क्लिअरन्ससाठी अडथळा आणेल आणि मला विनाकारण मानसिक व आर्थिक नुकसान होईल, असे अॅन्टोनिओ याने सांगितल्याने, त्यांनी २७ लाख ८४ हजार रुपये पाठवले.
एस. इन्शुरन्स यांच्यामार्फत शिपमेंटचा विमा देखील त्यांनी केला. कॉपर स्क्रॅप कंटेनर पाठविण्यात आल्याची सर्व माहिती त्यांना पाठवण्यात आली. त्यानंतर त्यांनी आणखी २० लाख २८ हजार रुपयांची मागणी ई-मेलद्वारे केली. फिर्यादी यांनी ही मागणी अमान्य केल्यानंतर, कंटेनर दुबई पोर्टवरून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली.
तसेच कंटेनर दुबई कस्टमच्या ताब्यात देऊन त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. या प्रकाराबाबत त्यांना संशय आल्याने त्यांनी मुंबईतील मॅक्स शिपिंग लाईन कंपनीशी संपर्क साधून माहिती मिळवण्यास सांगितले.
तेव्हा अॅन्टोनिओ याने ज्या कंटेनरमधून कॉपर स्क्रॅप पाठविल्याचे सांगितले होते, त्या कंटेनरमधून प्रत्यक्षात गुजरातमधील कनम पेपर्स या कंपनीला पेपर वेस्ट पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
