मतदान प्रक्रियेद्वारे तेजल ‘मुख्यमंत्री’ व समर्थ ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : हिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालसंसद उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची लोकशाही निवडणूक पार पडली. मतदान प्रक्रियेद्वारे तेजल हिला ‘मुख्यमंत्री’ तर समर्थ याला ‘उपमुख्यमंत्री’ म्हणून निवडण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्रचार, मतदान आणि मतमोजणीचा अनुभव घेत लोकशाही प्रक्रियेचा अभ्यास केला.
बालसंसद उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी प्रचार मोहिमा राबवल्या आणि डेमो ईव्हीएम मशिनद्वारे मतदानाचा अनुभव घेतला. शिक्षक व विद्यार्थ्यांनी उमेदवारांना मतं दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांची नेतृत्व क्षमता, संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता विकसित होण्यास मदत होते, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. बालसंसद हे विद्यार्थ्यांसाठी आपले विचार मांडण्याचे प्रभावी व्यासपीठ असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास शिक्षिका राजश्री दिसले, शोभा काशीद, जया भालचीम, तसेच पिरामल फाऊंडेशनचे प्रोग्रॅम लीडर रमेश जायनाकर, गांधी फेलोज विवेक कुमार व कोमल शर्मा आदी उपस्थित होते.
निवडणुकीनंतर दशरथ पवार सर यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी नव्याने निवडून आलेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजीवन खांडेकर सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
