येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न : नणंद आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एका १९ वर्षांच्या नवविवाहित हिंदू महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने पाणी पाजण्याचा प्रयत्न करून तसे न केल्यास पती व दिराविरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या ३४ वर्षीय नणंद व तिचा मित्र फ्रान्सिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ मे ते ८ जुलै २०२५ दरम्यान घडल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा काही महिन्यांपूर्वी हिंदू पद्धतीने विवाह झाला होता. तिची नणंद व तिचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्म स्वीकारले असून, सर्वजण एकत्र राहत आहेत. फिर्यादी महिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार देत असल्याने तिची नणंद वारंवार तिच्यावर दबाव आणत होती. या दरम्यान तिने फिर्यादीला मारहाण केली, तसेच शिवीगाळ करत धमकावले.
पुढे, नणंदेचा मित्र फ्रान्सिस याने फिर्यादी महिलेच्या हातात बाटली दिली आणि “हे पाणी येशू ख्रिस्ताच्या नावाने प्यावे,” असे सांगितले. मात्र, तिने पाणी न पिल्याने त्यानेही तिला धमकावत सांगितले की, “जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्या पती आणि दिराविरोधात पोलिसांत खोट्या तक्रारी दाखल करू.” या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहेत.
