भीमाशंकरला नेऊन चाकूच्या धाकाने खिशातील रोकड जबरदस्तीने घेतली काढून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दिल्ली येथील एका व्यापाऱ्याला भीमाशंकर दर्शनाला घेऊन जाऊन, परत येताना जंगलातील रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून, गुगल पे द्वारे तसेच खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सुरेशचंद्र चौहान (वय ६९, रा. बदरपूर, दक्षिण दिल्ली) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौहान हे कामानिमित्ताने पुण्यात आले होते. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेटमधून बाहेर आले.
तेव्हा एक रिक्षाचालक तेथे उभा होता. चौहान यांनी त्याला भीमाशंकरला दर्शनासाठी जायचे असल्याचे सांगितले. रिक्षाचालकाने त्यांना दर्शनासाठी नेण्याची तयारी दर्शवली. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ते रिक्षाने निघाले आणि दुपारी एक वाजता भीमाशंकरला पोहोचले.
दर्शन घेतल्यानंतर, दुपारी चारच्या सुमारास ते परतीच्या प्रवासाला निघाले. भीमाशंकर परिसरातील जंगल रस्त्यावर रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली आणि चौहान यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यांच्या मोबाईलवरून गुगल पे द्वारे ४,५०० रुपये आणि खिशातील १५,००० रुपये अशी एकूण १९,५०० रुपयांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर व्यापार्याला जंगलात सोडून रिक्षाचालक फरार झाला.
यानंतर चौहान पुण्यात परतले आणि त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्याच्या मदतीने रिक्षाचालकाचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
