दारू पिऊन देत होता त्रास : बिबवेवाडीतील अपर सुपर गणेशनगरमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : लहान भाऊ काही कामधंदा न करता सतत दारू पिऊन सर्वांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रवीण ऊर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अपर सुपर गणेशनगर, लेन नं. ३, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. बिबवेवाडी पोलिसांनी मोठा भाऊ अनिकेत दत्तात्रय नवले (वय २६) याला अटक केली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिकेत सख्खे भाऊ आहेत. अनिकेत हा विवाहित असून तो मोलमजुरी करतो. आई-वडिलांसह ते एकत्र राहतात. मागील काही दिवसांपासून प्रवीण सतत दारू पिऊन घरातील सर्वांना त्रास देत होता. काहीही कामधंदा करत नव्हता.
त्याच्या सततच्या त्रासामुळे सोमवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी अनिकेत याने प्रवीण याला ‘‘दारू पिऊन त्रास कशाला देतोस? काहीतरी कामधंदा कर,’’ असे म्हटले. त्यावरून त्यांच्यातील वाद वाढला. रागाच्या भरात अनिकेत याने प्रवीणवर घरातील चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.
याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बिबवेवाडीचे पोलीस मार्शल तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्रवीण याला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मोठा भाऊ अनिकेत नवले याला अटक केली आहे.
