पानटपरीवर झाला होता वाद : कानाखाली मारल्याच्या रागातून केला खून
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पानटपरीवर एकमेकांकडे पाहण्यावरून झालेल्या वादातून, कानाखाली मारल्याच्या रागातून तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पळून जाणाऱ्या हल्लेखोराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.
धैर्यशील ऊर्फ सचिन बळीराम मोरे (वय २३, रा. सुवर्णयुग नगर, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आर्यन ऊर्फ निखील अशोक सावळे (वय १९, रा. ठेंगोडा, सटाणा, जि. नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आर्यन सावळे हा १८ दिवसांपूर्वी नाशिकहून मामाकडे राहायला आला होता. तो एका सलूनमध्ये काम करत होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता तो पान खाण्यासाठी साई सिद्धी चौकात गेला होता. तेथे धैर्यशील मोरे हा सिगारेट पित उभा होता.
धैर्यशीलने आर्यनला “माझ्याकडे काय पाहतोस?” असा जाब विचारला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आर्यन सावळे याने धैर्यशील मोरेच्या कानाखाली मारले. त्याचा राग येऊन धैर्यशीलने त्याच्याकडील चाकूने आर्यनवर सपासप वार केले. त्यात आर्यनच्या हाताची बोटे तुटली.
गंभीर जखमी झालेल्या आर्यनला रुग्णालयात नेले असता, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस धैर्यशील मोरेचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मोरे हा आंबेगाव पठार येथील चिंतामणी शाळेसमोरून पळून जाताना दिसला.
त्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, रमेश चौधरी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, नागेश पिसाळ, मिलिंद गायकवाड यांनी केली.
