औंधमधील ब्रेमेन चौकातील घटना : पडीक जागेत जाताना विद्युत रोहित्राला झाला स्पर्श
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री औंधमधील ब्रेमेन चौकात घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले तरुण ब्रेमेन चौकातील एका पडीक जागेत दारू पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी जवळ असलेल्या विद्युत रोहित्राला झालेल्या स्पर्शामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली.
विनोद चिंतामण क्षीरसागर (वय २९, रा. कस्तुरबा वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे (वय २७, रा. पौड रस्ता, कोथरूड) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि सौरभ हे मित्र असून औंधमधील ब्रेमेन चौकात महावितरणचा एक रोहित्र आहे. रोहित्राजवळ एक पडीक जागा असून त्या जागेचा कोणीही वापर करत नाही.
रविवारी रात्री दोघे जण त्या पडीक जागेत मद्यपान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित्रातून उतरलेल्या विद्युत प्रवाहाला त्यांचा स्पर्श झाला. विजेचा धक्का बसल्याने दोघांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नागरिकांनी त्यांना रोहित्राजवळील पडीक जागेत मृतावस्थेत पडलेले पाहिले. त्यांनी याबाबतची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.
महावितरणकडून चौकशी – या दुर्घटनेची महावितरण व पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. महावितरणच्या तंत्रज्ञांनी दिलेल्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पावसाळ्यात विद्युत प्रवाह पाण्यात उतरून अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. दोन वर्षांपूर्वी हडपसर भागात साचलेल्या पाण्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता.
