पतसंस्थेतील पिग्मी बचत, गोल्ड भिशी आणि सोन्याची डिलिव्हरी न देता तिन्ही प्रकारांत फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पतसंस्थेच्या पिग्मी बचत योजनेचे डेली कलेक्शन करणाऱ्या एजंटाला सराफाने ओळखीतून सोन्याचा डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरीवर ठेवले. त्याने पिग्मी बचत योजना, गोल्ड भिशीचे पैसे घेऊन हडप केले. ग्राहकांना देण्यासाठी दिलेले सोने परस्पर लंपास करून त्याने तब्बल ८६ लाख ६२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
याबाबत पवन केसरीमल ओसवाल (वय ४०, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महेश मोहन ओसवाल (रा. सेंट्रल स्ट्रीट, कॅम्प), त्याची पत्नी दीप्ती महेश ओसवाल आणि भाऊ ललित मोहन ओसवाल (रा. गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कस्तुरे चौकातील ओसवाल ज्वेलर्स दुकानात १ जानेवारी २०२३ ते १४ जुलै २०२५ दरम्यान घडला आहे. “गेम व मॅचमध्ये पैसे हरल्याचे” कारण त्याने दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन ओसवाल यांचे कस्तुरे चौकात ‘ओसवाल ज्वेलर्स’ हे दुकान आहे.
महेश ओसवाल हा २०१७ मध्ये जनहित नागरी सहकारी पतसंस्थेचे पिग्मी (डेली कलेक्शन) घेण्याचे काम करत होता. तो त्यांच्या दुकानातूनही कलेक्शन करत असे. २०२२ मध्ये त्यांच्या ओळखीचे कुंदन ओसवाल दुकानात आले होते. त्यावेळी महेश ओसवाल नेहमीप्रमाणे कलेक्शनसाठी आला होता.
कुंदन ओसवाल यांनी तो त्यांचा पुतण्या असून विश्वासू आहे, त्याला कामावर घ्या, असे सुचवले. त्यानुसार पवन ओसवाल यांनी ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना देण्यासाठी सोने आणि दागिने पोचवण्याचे काम महेशकडे सोपवले. त्याच्या कामावर विश्वास असल्याने तो रोख किंवा चेक स्वरूपातील रक्कम दुकानात आणून देत असे.
विश्वास संपादन केल्यानंतर त्याने फसवणुकीला सुरुवात केली. त्याने सांगितले की, पिग्मी कलेक्शनचे काम तो पत्नी दीप्तीच्या नावावर करतो. त्याने पत्नीसाठी उधारीवर ३ लाख ७६ हजार ५०९ रुपयांचे दागिने घेतले.
“तुम्हाला टॅक्स जास्त बसतो” असे सांगून त्याने पत्नीच्या नावावर पिग्मी योजना सुरू करण्यास भाग पाडले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादींनी दीप्ती ओसवाल यांच्या नावावर पैसे जमा करायला सुरुवात केली.
महेश ओसवालने १२ लोकांची दरमहा ७५ हजार रुपयांची गोल्ड भिशी योजना सुरू केली होती. त्याचे संपूर्ण व्यवहार तो स्वतः पाहत होता. त्याने तिघांकडून ६ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. त्यांच्या परतफेडीबाबतही महेशच्या सांगण्यावरून फिर्यादींनी विश्वास ठेवला होता.
ऑगस्ट २०२४ नंतर त्याच्या कामातील चुका लक्षात येऊ लागल्या. ग्राहकांना देण्यासाठी दिलेले दागिने त्यांनी मिळवले नाहीत, हे निदर्शनास आले. एकूण ६८ लाख ८१ हजार ४२० रुपयांचे सोने त्याने ग्राहकांपर्यंत पोहोचवले नव्हते.
जाब विचारल्यावर महेशने “कौटुंबिक अडचणी आहेत, मार्च २०२५ पर्यंत सर्व परत देतो,” असे सांगितले. परंतु नंतर त्याने “गेम व मॅचमध्ये पैसे हरले” असे कारण सांगितले. फिर्यादींनी जनहित पतसंस्थेत चौकशी केल्यावर त्यांच्या पत्नीच्या नावावर कोणतेही खाते नसल्याचे स्पष्ट झाले.
महेशने दिलेले बँकेत पैसे भरल्याच्या पावत्या व बुकचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले होते – ते बनावट होते. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुतार करत आहेत.
महेश ओसवाल याने पिग्मी बँकेचे एकूण ७ लाख ३० हजार रुपये, गोल्ड भिशीमध्ये भरणा केलेली रक्कम ६ लाख ७५ हजार रुपये आणि डिलिव्हरीसाठी दिलेले ६८ लाख ८१ हजार ४२० रुपये तसेच पत्नीसाठी उधारीवर नेलेले ३ लाख ७६ हजार ५०८ रुपयांचे दागिने असे एकूण ८६ लाख ६२ हजार ९२८ रुपयांची फसवणुक केली.
